————————————–
(जिद्दीने केलेल्या प्रेमाची आठवण एका टप्प्यावर अशी येते.._)
.
कालच्या डायरीवरती पुन्हा
मोजले गुलाब केला गुन्हा
मी मोकळे सोडून केस
मांडला डाव तोच जुना
.
उरली गवतफुलावर भरभर
मृदू नात्याची जाणीव थरथर
राहिले अन प्राजक्त कुसुमी
बालपण मी जे शोधी नखभर
.
तुला त्याला अन मलाही वाटले
शाळा सोबती मनी दाटले
राहिली एकटी पाटी शहाणी
मैत्र जगी जरी आटले
.
तरुणाईची उडता पाने
कर्तुत्वाची माजली राने
मनस्वी मनगटी हट्टासाठी
चढले जिने उतरले जिने
.
तुझ्या मोरपिसाच्या देठी
निशिगंधाची चांदणमिठी
जागल्या राती बेबंद नवथर
युवा तुझ्या त्या डोळ्यांसाठी
.
आता नदीही शांत झाली
जिद्द जाळून थंड काहिली
विजयाचे ते अर्थ शोधता
प्रेम मागे, जीवन पुढच्या पावली
—————————————-